dwn
Toll Free
SPRS


फेरीवाले व ना फेरीवाले झोन विभागीय कार्यालय क्र १ ते ४ यादी
| जुनी ऐतिहासिक ठिकाणे |
एखाद्य़ा शहराच्या इतिहासाचे साद-पडसाद तेथील लोकजीवनावर व विविध संस्थांवर प्रकर्षाने जाणवतात. कोल्हापूर शहराच्या आजच्या वैभवशाली विस्ताराचे बीज त्याच्या इतिहासात शोधता येते. प्रांगैतिहासिक व इतिहासकाळात भारतीय जनजीवनात जी विविध स्वरूपाची स्थित्यंतरे घडून आली ती करवीरच्या परिसरातही प्रकटतात.इ.स.पूर्व १ ल्या शतकापासून ते इ.स. ९ व्या शतकापर्यत ऐतिहासिक कालखंडात कोल्हापूर येथील वसाहत आजच्या ब्रह्यपुरीच्या टेकडीवर होती. ब्रह्यपुरीच्या टेकडातील अवशेषांचे अन्वेषण व उत्खनन असे दर्शविते की, सातवाहन काळात या परीसरात समृध्द व सुसंस्कृत लोकसमुदाय वस्ती करून रहात होता. इ.स. २२5 ते 55० पर्यत वाकाटक,कदंब,शेद्रक व मौर्य या प्राचीन राजघराण्यांचे राज्य होते. इ.स.550 ते ७53 या कालखंडात बदामीच्या चालुक्य घराण्याची सत्ता येथे प्रभावी होती.

इ.स.६३४ मध्ये या घराण्यातील राजा कर्णदेव याने महालक्ष्मी मंदिराच्या उभारणीस प्रारंभ केला. बहुतेक सर्व चालुक्य सम्राट कोल्हापूरास ‘दक्षिण काशी' व ‘महातीर्थ' संबोधितात. इ.स.७53 ते ८5० या कालखंडात दक्षिणेस राष्ट्रकूटाची सत्ता प्रस्थापित झाली. तेव्हा कोल्हापूरसुध्दा त्यांच्या सत्ताक्षेत्रात आले. पुढे इ.स. १२१० पर्यत शिलाहारांनी येथे राज्य चालविले. अशा प्रकारे ऐतिहासिक काळात शिलाहारांचे एक प्रमुख सत्ताकेंद्र या नात्याने कोल्हापूर शहराने मोलाची कामिगरी बजावली आहे. या घराण्यातील राजा गंदरादिव्य याच्या काळातील शिलालेखात या नगरीचा उल्लेख ‘महातीर्थ' असा आढळतो. त्याने महालक्ष्मी मंदिराचे बांधकाम पू्र्ण केले. या सम्राटाची बहिण चंद्रिकादेवी हिचा विवाह चालुक्य नरेश दुसरा विक्रमादित्य याच्याशी झाला व परिणामी कोल्हापूरचे वैभव वाढीस लागले.

ब्रह्यपुरी, उत्तरेश्वर, खोलखंडोबा, रंकाळा, पद्माळा, रावणेश्वर ही प्राचीन काळातील कोल्हापूरची नैसर्गिक केंद्रस्थाने होती. म्हणजे कोल्हापूर शहराचा हा परिसर प्राचीन काळातील ओळखला जातो. उपरिक्त सर्व केंद्रांचे स्वरूप छोटया खेड्यासारखे होते. इ.स.च्या ९ व्या शतकात महालक्ष्मी मंदिराची स्थापना झाली. त्यामुळे ही सर्व ग्रामस्थाने एका प्रबळ सांस्कृतिक व आर्थिक केंद्रबिंदूत बांधली गेली. शिलालेख, वाड्मयीन साधने वास्तुकला या प्रमुख निकषांच्या आधारे महालक्ष्मी देवालायाचा कालखंड हा ९ व्या शतकाच्या (राष्ट्रकूटांचे युग) मागे नेता येत नाही, असे पुरातत्वज्ञ मानतात.

कोल्हापूर या स्थल नामाचा भौगोलिक व सांस्कृतिक बंध तपासणे हेसुध्दा तेवढेच महत्वाचे आहे.दक्षिण काशी म्हणून करवीर पीठाचा उल्लेख वाड्मयात आढळतो. महालक्ष्मीने आपल्या शुभदायक करांनी या नगरीला प्रलयकाळाच्या संकटातून सुरक्षित उचलेले म्हणून त्यांस‘ करवीर ’असे सार्थपणे संबोधिले जाते. असे व्युत्पत्ती मेजर ग्रॅहॅम यांनी सूचित केलेली आहे, तर महालक्ष्मी देवीने आपल्या हाताने उचलून धरले ते ‘करवीरनगर’ असा उल्लेख ‘करवीर महात्म्या’ त आढलते. हरि पुराणातही ‘करवीर’ असेच नामभिधान आढळते.

करवीरवासिनी महालक्ष्मी :
महालक्ष्मीच्या प्रतिष्ठापनेनंतर शहराचा उल्लेख करवीर असा आढळतो.तत्पुर्वी कोल्लापुर,कोल्लपुर,कोल्लगिरी,कोल्लादिगिरीपट्टण अशी नावे प्रचिलत होती. कोल्ल म्हणजे दरी व द-यांचे गाव म्हणजे कोल्हापुर,अशी ही व्युत्पत्ती मानली जाते. सारांश काय तर ब्रम्हपुरी,करवीर व कोल्हापुर अशी स्थल नामांची बहुविध रुपे उपलब्ध होतात.महालक्ष्मी देवालयाच्या स्थापनेमुळे कोल्हापुरात धार्मिक केंद्राचे स्वरुप प्राप्त झाले त्यातुनच सांस्कृतिक व आर्थिक क्रांतीची नानाविध रुपे प्रकट झाली.

इ.स.१२ व्या शतकाच्या कोल्हापुरात शिलाहारांचे राज्य होते. इ.स.१२१0 मध्ये देवगिरीचा राजा सिंधणदेव याने कोल्हापुराच्या शिलाहार सम्राट भोजराजाचा पराभव केला.त्यानंतर देवगिरीच्या यादवांच्या एका प्रांताची राजधानी म्हणुन कोल्हापुर अग्रेसर राहिले.१२९८ मध्ये देवगिरीच्या यादवांचा पराभव झाल्यानंतर 1306-1307 मध्ये कोल्हापुर शहरात मुस्लिम सत्तेचा अम्मल स्थापन झाला. श्रीछत्रपती शिवाजी महाराजांनी पन्हाळगड जिंकल्यानंतर (१६६९) पुनश्च कोल्हापुर परिसर स्वराज्यात समाविष्ठ झाला.पुढे स्वातंत्र्य युध्दाच्या व कोल्हापुर शहराने मोलाचा इतिहास घडविला आहे.महाराणी ताराबाईच्या काळात कोल्हापुर शहरांस राजधानीचे स्वरुप प्राप्त झाले. इ.स.१७८२ साली करवीर राज्याच्या स्थापनेनंतर कोल्हापुर शहराचा विस्तार झपाट्याने होउ लागला.

इ.स.च्या ५व्या शतकात कोल्हापुर येथे जैनांचे आगमन झाले.१३ व्या शतकात विद्याशंकर भारती यांनी शृंगेरी पीठाच्या मठाची स्थापना केली.अशा प्रकारे धार्मिक केंद्रातुन कोल्हापुरास दक्षिण काशी असे मानाचे स्थान प्राप्त झाले. त्याव्दारे नवीन वसाहती व पेठांची स्थापना झाली.महालक्ष्मी देवालय हे एक गुरुत्वाकर्षण बिंदु बनले व त्या दिशेने शहराची वाढ होउ लागली.१७ व्या शतकात राजकिय सत्ताकेंद्र म्हणुन शहर वैभवाच्या शिखरावर होते.तर १९ व्या शतकाच्या सामाजिक सुधारणा प्रवाहाचे मुलस्त्रोत म्हणुन राजर्षि छत्रपती शाहु महारांजांच्या काळात या शहराने महत्त्वपुर्ण कामगिरी बजावली आहे.

नव्या युगाची चाहुल :
कोल्हापुर नगरपालिकेची स्थापना १२ आँक्टोबर १८५४ रोजी करण्यात नगरपालिकेची स्थापना झाल्याने आधुनिक कोल्हापुर शहराच्या पध्दतशीर रचनेस प्रारंभ झाला.प्रयत्नपुर्वक आखणी करुन सुस्थित वा सुसह्य नागरी जीवनाच्या उभारणीसाठी जाणीवपुर्वक प्रयत्नास सुरुवात झाली. सौख्य,आरोग्य व सौंदर्य यांच्या अभिवृध्दीची नव्या युगातील सर्जनशील नागरी जीवनाची ही चाहुल विविध क्षेत्रात प्रकटु लागली.१९४१ ते १९४४ हा कालावधी नगरपालिकेच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखा आहे.या काळात नागरी जीवनाच्या विविध क्षेत्रात वैशिष्ट्यपुर्ण परिवर्तन घडुन आले.

मार्च १९४१ मध्ये झालेल्या त्रैवार्षिक निवडणुकीत स्थानिक स्वराज्य संघ ही संस्था स्थापन करण्यात आली.त्यात भाई माधवराव बागल, शेठ गोविंदराव कोरगांवकर, रत्नाप्पा कुंभार ह्या तिघांचे नियंत्रण मंडळ स्थापन करण्यात आले.कोणतही भेद न करता जनतेची निरूपेक्ष सेवा करणे हे या संघाचे ध्येय आहे.इतर कोणत्याही राजकीय संस्थेशी या संघाचा संबंध नाही. दरबारने स्थानिक स्वराज्याचे जेवढे हक्क जनतेच्या हवाली केले आहेत त्यांचा पुरेपूर उपयोग करून घेणे हे आपल्या संघाचे कर्तव्य वाटते । असे ह्या संघाच्या जाहिरनाम्यात म्हंटले आहे.

महापालिकेकडे आगेकूचः :
१९५४ ते ७१ हा कालखंड कोल्हापूर शहराच्या गतिमान विस्ताराचा कालखंड होय.या काळात नगरपालिका वेगाने महानगरपालिकेकडे वाटचाल करताना आढळते.१९६० साली नगरपालिकेत ४४ सदस्य कार्यरत असल्याचे नोंद आहे.त्यापैकी ३७ सर्वसाधारण, ३ मागासवर्गीयांसाठी राखीव व ४ स्त्रियांसाठी राखीव असल्याचे आढळते.सर्वसाधारण सभा ,मुख्याधिकारी व स्थायी समिती या प्रशासकीय त्रिकोणावर पालिकेचा कारभार चालत असे.मुख्याधिकारी यांच्या मदतीस अभियंता व आरोग्य अधिकारी यांच्याशिवाय लेखाधिकारी, पर्यवेक्षक, जकात व कर अधिक्षक हेसुध्दा मदतीस असत.१९५६-५७ साली कर इत्यादि मार्गांनी नगरपालिकेचे वार्षिक उत्पन्न ३३ लाख २१ हजार २१३ रूपये होते.तर खर्च २९ लाख २९ हजार १६१ रूपये होता.यावरून नगरपालिकेचा वाढता व्याप स्पष्ट होतो.या काळात शहरात रस्त्यांचे जाळे तयार झाले. आवश्यक तेथे नवीन पूल उभारण्यात आले.पाणीपुरवठा व्यवस्था कार्यक्षम करण्यात आली.नवनवीन मार्केट, उद्याने उभारून शहराच्या सौंदर्यात भर टाकण्यात आली.

कोल्हापूर शहरात उद्योगप्रियता वाढीस लागून परिणामी यंत्रमहर्षि वाय.पी.पवार, महादबा मिस्त्री, तात्या शिंदे, कै.रामभाई सामाणी इत्यादींच्या कष्टपूर्वक प्रयत्नामुळे यांत्रिकिकरणाचे नवे युग सुरू झाले.उद्यम नगरीचा विशाल परिसर यंत्र सामुग्री व सुटे भाग यांच्या निर्मिती कार्यात मग्न राहिला.कोल्हापूर उद्योग वसाहतीतील उत्पादने अनेक आशियाई व आफ्रिकन देशात निर्यातही होऊ लागली. कोल्हापूर शहराच्या औद्योगिक वाटचालीत नगरपालिकेने वारंवार सहाय्यभूत असे कार्य केले.याच कालखंडात १९६२ साली डॉक्टर राधाकृष्णन यांच्या हस्ते शिवाजी विद्यापीठाची स्थापना झाली व कोल्हापूर हे प्रगत शैक्षणिक पुनर्रचनेस केंद्र म्हणून उदयास आले.या काळात अशा प्रकारे नगरपालिकेच्या सहयोगाने औद्योगिक व शैक्षणिक पुनर्रचनेस हातभार लागला.डिसेंबर १९७२ मध्ये नगर परिषद मंडळ बरखास्त करण्यात आली.

प्रशासक काळातील महानगरपालिकाः नगर परिषदेचे दि.डिसेंबर १९७२ रोजी महानगरपालिकेत रूपांतर झाले.शहराची वाढती लोकसंख्या व वाढत्या नागरी समस्या सोडविण्यासाठी महानगरपालिका ही काळाची गरज होती.१९७२ ते ७८ या काळात व्दारकानाथ कपूर , श्री.ना.मा.देवस्थळे, श्री. डी.टी. जोसेफ ,श्री. वि. ना. मखिजा यांनी प्रशासक या नात्याने कार्य पाहिले.शहराची सुधारित विकास योजना हे महानगरपालिकेचे मोठे ध्येय आहे. १९६० च्या नगर विकास योजनेनुसार नगर रचना शास्त्राच्या आधारे उपनगराची रचना करण्यात आली. विकास योजना राबविताना विस्थापित झालेल्या नागरिकांचे पुनर्वसन करण्याचा कार्यक्रम अंमलात आणण्यात आला.

लोकनियुक्त प्रतिनिधींचे युग :
आँगस्ट १९७८ मध्ये ख-या अर्थाने पहिली लोकनियुक्त महानगरपालिका अस्तित्वात आली. या काळात श्री. बाबासाहेब कसबेकर (१९७८ ते १०७९), श्री. नानासाहेब यादव (१९७९ ते ८०), कै. द. न. कणेरकर (१९८०), बाबुराव पारखे(१९८० ते ८१), प्रा. श्री. सुभाष राणे यांनी महापौर या नात्याने कोल्हापूर शहराच्या विकासात सिंहाचा वाटा उचलला आहे. श्री नानासाहेब यादव यांच्या काळात भारतात अन्यत्र कुठेही नसलेली स्मशानभूमीत मोफत प्रेत दहन करण्याची यंत्रणा अमलात आली. कै. द. न. कणेरकर यांच्या कारकीर्दीत कावळा नाका येथे रणरागिणी ताराराणीचा पुतळा उभारण्यात आला आणि आधुनिक पध्दतीचे रस्ते करण्याच्या कामाचा शुभारंभ झाला. भविष्यकाळात कोल्हापूर महानगरपालिकेस रस्ते सुधारणा, प्रदूषण निर्मूलन, आरोग्य सुधार याबाबतच्या वाढत्या नागरी गरजा पूर्ण कराव्या लागतील. आजवरचे कार्य समाधानकारक असे न मानता जनतेचा अधिकाधिक सहभाग वृध्दिंगत करण्यावर भर द्यावा लागेल. भौतिक सुधारणांबरोबरच लोकशिक्षण व समाज जागरण यावर लक्ष केंद्रीत करावे लागेल. छत्रपती राजाराम महाराजांनी म्हंटल्याप्रमाणे, ‘स्थानिक स्वराज्य म्हणजे केवळ अधिकाराचा उपभोग घेणे व कर्तव्याची जाणीव नसणे असे नव्हे’, हा विचार सतत लक्षात घेऊन स्नेहभाव व सार्वजनिक सेवाबुध्दी वाढीस लावण्याची खरी गरज आहे तरच स्थानिक स्वराज्याची फळे समाजातील सर्व स्थरांपर्यंत चाखता येतील व लोकहितातील लोकशिक्षण प्रभावी होऊ शकेल.

  मुखपृष्ठ
English Version
dwn
dwn
dwn
dwn
dwn
ई-वार्तापत्र
Designed and Maintained by Kolhapur Municipal Corporation