| प्रेक्षणीय स्थळे » विशाळगड | |
इथेच पडिला बांध खिंडिला बाजीप्रभुच्या छातीचा
इथेच फुचली छाती , परी ना दिमाख हरला जातीचा।
आठवण येता अजुन येतो, खिडीचा दाटून गळा।
विशाळगडाच्या विशाल भाळी, रक्तचंदनी खुले टिळा ।।
|
केशव पंडित आपल्या राजाराम चरितम् काव्यात म्हणतात, विशाळगडी दुर्गही सांप्रत विद्यते तव । अत्रापि दुर्ग सामाग्री परिपुर्णेन
भाति मे ।। यावरूनच गडाचे नाव विशाळगड आहे हे समज उमगते . पण काही कागदात व शिलालेखास यास खिला खिला, खिला
गिला खेळणा असेही म्हटले आहे. शिवराजांनी या गडास विशाळगड हे नाव दिले.
कोल्हापूर जिल्ह्यात पश्चिम सरहद्दीवर बसलेला हा विशाळगड. गडाचे अक्षांश हे १६-५६ व ७३-४७ असे आहेत. समुद्र सपाटीपासुन
याची उंची ३३०० फूट आहे. कोल्हापूर ते विशाळगड हे अंतर ८६ कि.मी. आहे. कोल्हापूरहून जाताना वाटेत पन्हाळगड दिसतो आणि
सह्याद्रीचा जो फाटा सुरू होतो तो थेट मलकापूरपर्यंत आपल्या संगती राहतो. या फाट्यावरील अनेक लहान मोठे डोंगर, मन
आकर्षित करणा-या द-या, त्यातून वसलेली छोटी छोटी गावे सारेच विलोभनीय. गडावर जाण्यास पूर्वेकडून एक आणि पश्चिमेकडून दुसरी वाट आहे. नावाप्रमाणेच गड विशाल आहे. याची लांबी व रूंदी ३२००, १०४० फूट आहे. येथे वार्षिक पाऊस सरासरी २५० ते ३०० इंच पडतो. गडाच्या परिसरात मात्र एकही मोठे गाव नाही. गडावर
जी घरे आहेत त्यांनी कोणत्याही कामासाठी मलकापूरलाच यावे लागते. या गडावर राजा दुसरा भोज पासुन ते १८४९ पर्यंत बरीच
मोठी उलाढाल झाली. इतकेच नव्हे तर राजाराम महाराज चंदीस जाताना महाराष्ट्राची राजधानी विशाळगड हीच होती.
विशाळगड बांधणीचे श्रेय शिलाहार वंशीय दुसरा भोज राजा यास जाते. विशेषत कोल्हापूरचे शिलाहार हे या भागात अधिक
अग्रेसर होते. यातील वर उल्लेख केलेला दुसरा भोज प्रारंभी चालुक्यांचा सामंत होता. तो स्वतःला महामंडळेश्वर असे म्हणवीत होता.
याचवेळी चालुक्यांची सत्ता गुंडाळत आली होती व ती सत्ता आपल्या ताब्यात ठेवण्याची ते अखेरची धडपड करीत होते. या
सर्व परिस्थितीचा पुरेपूर फायदा घेण्याचे मनाशी ठरवून, पध्दतशीरपणे सह्याद्रीच्या या भागातील शिखरांची परीक्षा घेऊन
भोजाने जागोजागी गड उभारले व या गडांच्या आश्रयाने आपले स्वतःचे सामर्थ्य वाढवले. तसेच चालुक्यांच्या सामंत शाहीची झूल
झुगारून देऊन राजधिराजे व पश्चिम चक्रवर्ती ही बिरूदे त्याने धारण केली.
|
विशाळगड व कोल्हापूर हा भाग रठ्ठे महारठ्ठे यांच्या ताब्यात होता. इ. स. ९७३ पर्यंत राष्ट्रकूटांची येथे सत्ता चालू होती. त्यांना
जिंकून पुन्हा चालुक्य, शिलाहार, यादव, मराठे, पालेगार, अदिलशहा, शिवछत्रपती असे अनेक राजे व त्यांचे काल या गडाने पाहिलेत.
किल्ल्याचे बहुतेक बुरूज आणि तटबंदी ढासळलेली असून गडावरील स्थळांची देखील तीच अवस्था झाली आहे. किल्ल्याचे जुने वैभव जरी
नष्ट झाले असले तरी नैसर्गिंक सौंदर्य मात्र टिकुन आहे. राजापूरकडील दर्शनी बाजू सोडली तर किल्ल्याच्या इतर सर्व बाजूंनी
खोल द-या आणि सह्याद्रीच्या प्रचंड दाट व विक्राळ सोंडा यांचा गराडाच पडल्याचा भास होतो.
|
हा किल्ला रहदारीच्या मार्गापासुन १२ मैल आत जंगलभागात आहे. विशाळगडावर नवीन सर्व्हे नं. ८ मध्ये बाजीप्रभू देशपांडे यांची
समाधी असून जवळच त्यांचे बंधू फुलाजी यांचे वृंदावन आहे. हजरत पीर मलिक रैहानचा दर्गा हे गडावरील आणखी एक ठिकाण
मलिक रैहान नावाच्या साधूचे स्मारक आहे. दर्ग्याची इमारत जुनी असुन इ. स. १६३९ मध्ये राजापूर येथील एक धार्मिक व्यापारी
कोर्डूशेठ बल्लार यांनी विशाळगड संस्थानकडे एक मोठी देणगी देऊन या जुन्या इमारतीचा जीर्णोध्दार करविला.
अमृतेश्वर हे शंकराचे देवालय. अमृतराव प्रतिनिधी यांनी इ. स. १७५१ ते १७६२ मध्ये बांधले. देवालयासमोर पाण्याची छोटी कुंडे
आहेत. गडाची वरची चढण संपताच सपाटीला असलेल्या टेकडीसारख्या चौथ-याला रणमंडप म्हणतात. भोज राजाने जेव्हा भूपाल
तळे बांधले तेव्हा त्यातील माती काढून हा चौथारा तयार केला. गडावरील लढाया याच ठिकाणी झाल्यामुळे त्यास रणमंडप असे
नाव प्राप्त झाले आहे. हा भाग इंचावर असल्यामुळे सुर्यास्ताच्या वेळी समुद्राचे अत्यंत विलोभनीय दर्शन येथून घडते. मुंढा
उर्फ चोर दरवाजा हे आणखी एक ठिकाण येथून पुढे जाण्यास वाट नाही. मात्र टेहळणी करता येते.
कै. राजाराम महाराज हे इ. स. १७०० मध्ये सिंहगडी कालवश झाले. त्यांच्या तृतीय पत्नी अंबिकाबाई त्यांच्या पागोट्यासह सती
गेल्या. त्या साध्वीचे येथे वृंदावन आहे. त्याला सतीचे वृंदावन असे म्हणतात. गडावर सती गेलेल्या ५२ स्त्रियांची वृंदावने बावनसती
म्हणून ओळखली जातात. देहांत शासन देण्यासाठी येथे टकमक कडा आहे.याशिवाय रामचंद्र निळकंठ यांनी बांधलेला वाडा आहे.
अष्टमीच्या चंद्राच्या आकारातील अर्धचंद विहीर श्री भगवंकेश्वर,नरसोबाचे मंदीर,गौरीचे तळे, वोडणीचा मळा ,पाताळनगरी,डिकमाळ
गंजीचा माळ,तास टेकडी वगैरे प्रेक्षणीय स्थळेही गडावर आहेत.एकुणच पर्यटकांना समाधान देणारा हा एतहासिक वारसा आहे. |
|
|