| प्रेक्षणीय स्थळे » नृसिंहवाडी | |
कोल्हापूर जिल्हातील नृसिंहवाडी हे एक प्रसिध्द तीर्थक्षेत्र आहे.नृसिंहवाडी म्हणजे दत्तसंप्रदायची राजधानीच कोल्हापूरपासुन सुमारे
४५ कि.मी.अंतरावर कृष्णा आणि पंचगंगाच्या पावन संगमावर हे क्षेत्र वसलेले आहे.कोल्हापूरहून जयसिंगपूरमार्गे नृसिंहवाडीस
जाता येते.त्याचप्रमाणे कोल्हापूरहुन इचलकरंजी-कुरूंदवाडमार्गेही वाजीस जाता येते.मुंबई पुण्याहुन येणा-या प्रयटकांना मिरज अथवा
सांगली येथे उतरून नृसिंहवाडीत येणे सोयीचे होते.मिरज-कोल्हापूर लोहमार्गावरील जयसिंगपूर रेल्वे स्थानकापासून १२ कि.मी.
अंतरावर नृसिंहवाडी आहे.
श्री दत्तगुरूंचे अवतारामुळे नृसिंहवाडीचा परिसर पावन झाला असुन त्यांच्या स्वयंभू पादुकांची पूजा अर्चा येथे अखंड सुरू असते
श्री दत्तगुरूंचे साक्षात तिसरे अवतार मानले गेलेले श्री नृसिंह सरस्वती यांनी औदुंबर वृक्षानी बहरलेल्या या अरण्यभूमीत १२ वर्षे
वास्तव्य केले व त्यांनीच हा परिसर सुफल करून सोडला
|
अमरापूर या नावाने या क्षेत्राचा महिमा गुरू चरित्रात वर्णिलेला आढळतो.श्री नृसिंहसरस्वती औदुंबरचा चातुर्मास संपवून भ्रमंतीस
निघाले असता संचार करता करता ते याठिकाणी येऊन पोहोचले.त्यावेळी या ठिकाणी औंदुबर वृक्षाची वनेच वने होती.दत्तभक्तांच्या
आग्रहापूर्वक विनंतीवरून स्वामीनी आपले पुढील वास्तव्य येथेच केले.सुमारे १२ वर्षे नृसिंह सरस्वती स्वामी वास्तव्य याच ठिकाणी होते
व त्याचमुळे या क्षेत्राला नृसिंहवाडी अर्थात नरसोबावाडी असे नामभिधान प्राप्त झाले.स्वामीनीच या ठिकाणी श्री दत्त पादुकांची
स्थापना केली या क्षेत्राला कृष्णा-पंचगंगेच्या संगमामुळे व औंदुबर वृक्षांच्या घनदाट छायेमुळे मुळातच एक प्रकारची प्रसन्नता आलेली
होती.त्यातच स्वामींच्या वास्तव्यामुळे त्यात आणखीच पावित्र्याची भर पडली,येथील आकर्षकता वाढण्यास मदत झाली.
नृसिंहवाडीचे क्षेत्र कृष्णा व पंचगंगा या दोन नद्यांच्या मधोमध सुमारे एक चौरस मैल परिसरात पसरले आहे.गावची लोकसंख्या
सुमारे चार हजारापर्यंत आहे.कृष्णेच्या प्रशस्त अशा घाटावर मध्यभागी औदुंबर वृक्षाखाली सुंदर व मनोरम असे मंदीर आहे.
मंदीरातच स्वामीनी स्थापन केलेल्या दत्तपादुका आहेत.वाडीहुन गाणगापूरला जाताना योगिनींच्या आग्रहावरून स्वामीनी वालुकामय
पाषाणाच्या या पादुकांची स्थापना केली.त्यावरील सततच्या अभिषेकाने त्या झिजत नाहीत.म्हणुन त्यांची घडण चंद्रकांत पाषाणाची
असावी असे म्हणतात. |
सांप्रत उभे असलेले मंदीर विजापूरला अदिलशहा या मुसलमान बादशहाने बांधले आहे.विजापूरच्या बादशहाच्या मुलीचे डोळे
गेल्यामुळे तिला अंधत्व आले.तेव्हा बिदरच्या बादशहाच्या सांगण्यावरून बादशहा नृसिंहवाडीस आला.त्याने श्री गुरूंचे दर्शन घेतले व नवस
बोलला.पुजा-याने अंगारा दिला तो त्याने मुलीच्या डोळ्याला लावला असता तिला दृष्टी प्राप्त झाली.त्यामुळे बादशहा आनंदित झाला
त्याने कृष्णेच्या पैलतीरावरील औरवाड व गौरवाड ही दोन गावे देवस्थानच्या पूजेअर्चेसाठी इनाम दिल्याची नोंद आढळते.सध्या
उभे असलेले श्री गुरूमंदीर विजापूरच्या मुसलमान बादशहाने बांधले असल्याने त्यावर कळस नाही.तर लांबट आकाराची उंच अशी
वास्तू आहे आणि त्यासमोरच कृष्णेचा विस्तीर्ण घाट व कृष्णा नदी संथ वाहत आहे.
|
मधोमध श्रीगुरूज्या औंदुबर वृक्षाखाली बसत असत तो वृक्ष आणि त्याखाली नदीसन्मुख त्या मनोहर पादुका आहेत व त्यापुढे
थोडी मोकळी जागा आहे.त्याच ठिकाणी पुजारी बसतात व आतील गाभा-यात पादुकांचे पूजन करतात.या गाभा-याचे दार
अतिशय लहान आहे.पादुका ज्या सभागृहात आहेत त्याच्या दर्शनी भागावर चांदीचा अलंकृत पत्रा मढविला आहे.मधोमध गणेशपट्टी
त्यावर आजूबाजूला मयूर व जय-विजय आणि वरील बाजूस नृसिंह सरस्वती महाराजांची प्रतिमा उठवलेली आहे.पुजारी येथे
आसनस्थ होऊन पूजा-अर्चा करतात ,त्यांच्या एका बाजूला श्रीगणेशाची भव्य मूर्ती स्थापिली असून तिचीही पूजा होते
या मंदिराभोवती मोठा गोलाकार मंडप असून त्याला चारही बाजूंनी उंच व विस्तृत खांब आहेत.
|
|
|